सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहरात एका शिक्षकाचे चाकूचा धाक दाखवून अपहरण करत त्यांना एका खोलीत डांबून मारहाण केली आणि दोन वेगवेगळ्या QR कोडद्वारे तब्बल ₹3 लाखांची ऑनलाईन खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर गुन्ह्याची शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उकल करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ₹2,96,500 रुपयांची रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रांशु नवीनकुमार वर्मा (वय 30), व्यवसाय – शिक्षक, मूळ रा. मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश), सध्या रा. संचेती कॉम्प्लेक्स, जयलक्ष्मी मॉलजवळ, शिरपूर यांचे 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी आरोपी पवन शंकर हटकर व वैभव रामेश्वर सोनवणे यांनी चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने अपहरण केले. त्यानंतर त्यांना शिरपूर शहरातील तपनभाई पटेल मार्ग परिसरातील एका खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली. आरोपींनी पीडिताकडून दोन वेगवेगळ्या QR कोडद्वारे ₹3 लाखांची ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर करून घेतली. त्यानंतर ही रक्कम रोख स्वरूपात आणण्यासाठी त्यांच्या साथीदार बंटी उर्फ हर्षल मनोहर बोरसे याला पाठविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 299/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 140(2), 140(3) व 309(4) नुसार अपहरण, बळजबरी, मारहाण व जबरीने मालमत्ता हस्तगत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले. तांत्रिक तपास, आर्थिक व्यवहारांचा मागोवा आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम ऑनलाईन व्यवहाराशी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर शिंगावे शिवारातील पटेल मोटार कार सर्व्हिसिंग सेंटर परिसरातून आरोपी पवन हटकर (वय 22, जनता नगर, शिरपूर) व वैभव सोनवणे (वय 25, मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार) यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून बंटी उर्फ हर्षल मनोहर बोरसे हा या गुन्ह्यातील तिसरा साथीदार असल्याचे स्पष्ट झाले.आरोपींकडून ₹2,88,500 किंमतीच्या 500 रुपयांच्या 577 नोटा, ₹3,000 किंमतीच्या 100 रुपयांच्या 30 नोटा तसेच ओप्पो A-38 कंपनीचा मोबाईल असा एकूण ₹2,96,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, सपोनि. सतीश भांड तसेच गुन्हे शोध पथकातील रविंद्र आखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंके, मनोज दाभाडे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरिफ तडवी, प्रशांत पवार, सोमा ठाकरे आणि निलेश चौधरी यांनी पार पाडली. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.
![]()
