सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येवर कायमस्वरूपी व कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी धुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत बबनराव चौधरी यांनी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत नगराध्यक्ष चिंतनभाई यांनाही माहितीसाठी देण्यात आली आहे.दि. 20 जुलै 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनावेळी सामाजिक कार्यकर्ते राज भोई तसेच धुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस सचिन पवार उपस्थित होते.नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर शहरातील विविध भाग, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, बाजारपेठ आणि निवासी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे कळप मोठ्या प्रमाणात फिरत असून त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक सतत भीतीच्या छायेत वावरत आहेत.शहरात कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची नागरिकांकडून सातत्याने तक्रार होत असून, अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता केंद्र शासनाच्या Animal Birth Control (ABC) Rules, 2023 तसेच प्रचलित कायदेशीर तरतुदींनुसार नियोजनबद्ध आणि मानवीय पद्धतीने उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत तातडीने एबीसी (Animal Birth Control) सेंटर सुरू करून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात यावे, अशी ठोस मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही यासाठी विशेष पथक नेमून संवेदनशील भागांमध्ये त्वरित कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राज भोई आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस सचिन पवार यांनीही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.शहरातील वाढता भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नगरपालिकेकडून तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या जातात की नाही, याकडे आता संपूर्ण शिरपूरकरांचे लक्ष लागले आहे.
![]()
