सत्यध्येय एकविचार शिंदखेडा: ( यादवराव सावंत,प्रतिनिधी ):-
अनुसूचित जातीच्या (SC) उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आज शिंदखेडा शहरात जनआक्रोशाचा महापूर पाहायला मिळाला. ‘शिंदखेडा तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती’च्या वतीने तहसील कार्यालयावर एक भव्य महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिंदखेडा शहरासह संपूर्ण तालुक्यातील सर्व ५९ उपजातींमधील हजारो समाजबांधव आणि भगिनी अत्यंत शिस्तीत व आक्रमकतेने सहभागी झाले होते. मोर्चाच्या शेवटी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
शहरातील प्रमुख मार्गांवरून निघाली रॅली
सकाळी निश्चित केलेल्या ठिकाणी तालुक्यातील विविध गावांतून हजारो बांधव एकत्र आले होते. तेथून या महामोर्चाला सुरुवात झाली. हातात उपवर्गीकरणाच्या विरोधातील फलक, घोषणांचे फलक आणि एकजुटीचा जयघोष करत हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघाला. महामोर्चामुळे शहरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र कार्यकर्त्यांच्या शिस्तीमुळे मोर्चा शांततेत आणि यशस्वीपणे मार्गस्थ झाला.५९ जातींची अभूतपूर्व एकता या महामोर्चाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या सर्व ५९ जातींमधील समाजबांधवांनी एकत्र येत आपली वज्रमूठ दाखवली. “उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडेल आणि आरक्षणाच्या मूळ हेतूला धक्का बसेल,” अशी भावना मोर्चामधील वक्त्यांनी व्यक्त केली. महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची या मोर्चातील उपस्थिती लक्षणीय होती.तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादरमोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने माननीय तहसीलदार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दिव्या शिंदे रिलस्टार व वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे यांच्या नेतृत्वात सविस्तर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मुद्दे व मागण्या:
अनुसूचित जातीचे (SC) कोणत्याही स्तरावर उपवर्गीकरण करण्यात येऊ नये.
उपवर्गीकरणामुळे ५९ जातींमधील सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून, हा निर्णय तात्काळ रद्द व्हावा.
शासनाने समाजबांधवांच्या भावनांची दखद घेऊन हा निर्णय मागे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर शिफारस करावी.
कृती समितीचा इशारा
तहसील कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले की, “हा केवळ इशारा असून, जर शासनाने या जनभावनांची दखल घेतली नाही आणि उपवर्गीकरणाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न केला, तर आगामी काळात संपूर्ण धुळे जिल्हा आणि राज्य पातळीवर याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा सपोनि मयूर भामरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.तसेच शिरपुर येथील आर. सी. पी. ची कुवत तैनात होती.तालुक्यातील हा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी करण्यासाठी कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि समाजबांधवांनी परिश्रम घेतले. *महामोर्चात* नगराध्यक्षा कलावती माळी,नगरसेविका कमलताई पाटोळे,ॲड. अरविंदकुमार मंगासे, रामभाऊ माणिक, दीपक अहिरे, संजय पाटोळे, कैलास आखाडे, विनोद पाटोळे,कईम कुरेशी, ऍड. पंकज पाटोळे, रिपाई आठवले गट युवक जिल्हाध्यक्ष बापू ठाकरे नंदुरबार, जगन्नाथ ठाकरे तालुका अध्यक्ष नंदुरबार, राजेश सोनवणे, रमाबाई आखाडे सरपंच मांडळ, महेंद्र खैरनार, संजय कुवर, किशोर सुतार अनेक प्रमुखांची उपस्थिती होती.
![]()
