सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत प्रतिनिधी):
बोगस बियाणे आणि निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथील प्रयोगशील शेतकरी गणेश गंगाराम पवार यांना निकृष्ट दर्जाच्या वांग्यांच्या रोपांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. दोन एकर क्षेत्रात ५,००० रोपांची लागवड करूनही फळधारणेतील दोषांमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, याप्रकरणी त्यांनी तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी गणेश पवार यांनी निर्मल सीड कंपनीच्या ‘१२,१४’ या वांग्याच्या जातीची सुमारे ५,००० रोपे २० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘सदगुरू नर्सरी, पाटण (ता. शिंदखेडा)’ येथून खरेदी केली होती. ही रोपे त्यांनी आपल्या गट क्रमांक १०६/२ मधील २ एकर शेतात योग्य निगा राखून लावली.शेतकऱ्याने वेळेवर खते, पाणी आणि औषधोपचार केल्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित झाली; मात्र जेव्हा फळधारणेची वेळ आली, तेव्हा एकाच झाडावर लहान-मोठ्या विकृत आकाराची फळे येण्यास सुरुवात झाली. बाजारात विक्रीयोग्य फळे मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करण्यास नकार दिला. परिणामी, शेतकऱ्याचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याची मागणी काय?
हवालदिल झालेल्या गणेश पवार यांनी तालुका कृषी कार्यालयात धाव घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. आपल्या अर्जात त्यांनी खालील मुख्य मागण्या मांडल्या आहेत:
कृषी विभागाने तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतात जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित पंचनामा करावा.
वांग्याची रोपे, बियाण्याची गुणवत्ता आणि नर्सरी चालकाची भूमिका यांची सखोल चौकशी व्हावी.
बियाणे कंपनी अथवा नर्सरी चालक यांपैकी जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी.
शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्याला झालेल्या आर्थिक नुकसानीची योग्य ती भरपाई मिळवून द्यावी.
कृषी विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
तालुक्यात बोगस बियाणे व निकृष्ट रोपांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नर्सरी व कंपन्यांवर कृषी विभाग काय कारवाई करतो, याकडे आता संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर शेताची पाहणी करून पंचनामा करावा आणि बाधीत शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
“मी मोठ्या आशेने २ एकरांत ५ हजार वांग्यांच्या रोपांची लागवड केली होती. खते आणि औषधांवर मोठा खर्च झाला, पण रोपांच्या निकृष्ट दर्जामुळे फळे योग्य धरली नाहीत. माझे अतोनात नुकसान झाले असून कृषी विभागाने मला त्वरित न्याय आणि नुकसानभरपाई मिळवून द्यावी.”
गणेश गंगाराम पवार (बाधित शेतकरी, दरखेडा)
![]()
