सत्यध्येय एकविचार नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहर परिसरात सातत्याने पाण्याच्या मोटारी चोरी करून नागरिकांना आर्थिक फटका देणाऱ्या एका सराईत चोरट्याला नंदुरबार शहर पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सात पाण्याच्या मोटारी जप्त करण्यात मोठे यश मिळविले आहे. या प्रकरणात आणखी अनेक मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपास अधिक वेगाने सुरू आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील देसाईपूरा येथील रहिवासी रविंद्र दंगल मराठे यांच्या घराच्या ओट्यावर ठेवलेली पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास सुरू असताना शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान चंद्रशेखर नथ्थू मेश्राम (रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार) याच्यावर संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली.चौकशीदरम्यान आरोपीने नंदुरबार शहर परिसरातून एकूण सात पाण्याच्या मोटारी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या सर्व सात मोटारी हस्तगत केल्या. या आरोपीकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.दरम्यान, ज्या नागरिकांच्या पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्या असतील त्यांनी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.अल्पावधीतच या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला जेरबंद करण्याची ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली.या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख, भुनेश मराठे, हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील तसेच पोलिस कर्मचारी ललित गवळी, अमित भरवाड, राहुल राठोड, राजेंद्र कटके, रुपेश पगारे, विवेक ठाकरे, अनिल वसावे, नरेंद्र पाडवी आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल निंबा वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेत आरोपीला अटक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
![]()
