सत्यध्येय एकविचार भडगाव | प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने स्वतःच्या पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतवाडी तांडा येथे शनिवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता घडली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) याला दारूचे गंभीर व्यसन असून तो वारंवार पत्नीकडे दारूसाठी पैशांची मागणी करत असे. घटनेच्या दिवशी सकाळी त्याने पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय ३६) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, ललिता यांनी स्पष्ट नकार दिल्याने आत्माराम संतापाच्या भरात अनावर झाला.रागाच्या भरात त्याने घरात ठेवलेला धारदार चाकू उचलून पत्नीच्या पोटावर व शरीराच्या इतर भागांवर वार केले. गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने ललिता राठोड यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा रक्तरंजित प्रकार पाहून परिसरातील नागरिक हादरले.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने भडगाव पोलिसांना कळविले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.या प्रकरणी आरोपी आत्माराम पतीलाल राठोड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. या घटनेमागील सर्व परिस्थिती, कौटुंबिक वाद आणि इतर बाबींचा सखोल तपास भडगाव पोलीस करत आहेत.
![]()
