सत्यध्येय एकविचार शिंदखेडा | प्रतिनिधी (यादवराव सावंत)
समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि जनकल्याण या क्षेत्रांत सातत्याने व निःस्वार्थ भावनेने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आयझल फाउंडेशन व डॉ. वसीम कुरेशी यांना प्रतिष्ठेचा “स्व. अजितदादा पवार जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य व दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.समाजहिताची जपणूक, गरजू नागरिकांना आरोग्यविषयक मदत, शैक्षणिक उपक्रम, युवकांना प्रोत्साहन, सामाजिक सलोखा आणि लोकहिताच्या विविध उपक्रमांमधील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आयझल फाउंडेशन व डॉ. वसीम कुरेशी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेक गरजू घटकांना आधार मिळाला असून सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढताना नमूद केले.हा पुरस्कार सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील (अमळनेर), माजी आमदार रामकृष्ण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्यामदादा सानेर, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी आणि इरफान शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते आयझल फाउंडेशनचे पदाधिकारी आणि डॉ. वसीम कुरेशी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात समाजसेवा हीच खरी राष्ट्रसेवा असून समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना अशा पुरस्कारांमुळे अधिक प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले. आयझल फाउंडेशनने राबविलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.या सोहळ्याला आयझल फाउंडेशनचे अॅड. तालिब कुरेशी, इंजि. झाकीर कुरेशी, राहील शेख, उबैद खान, गाजी बाबा, डॉ. अदनान यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयझल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी हा सन्मान संपूर्ण टीमच्या सामाजिक कार्याची पावती असल्याचे सांगत, भविष्यातही समाजहिताचे उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.या गौरवाबद्दल परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आयझल फाउंडेशन आणि डॉ. वसीम कुरेशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
![]()
