सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिरपूर शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला. शहरातील पांचकंदिल परिसरात कार्यकर्त्यांनी मेलेडी चॉकलेटचे वाटप, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषपूर्ण घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. विद्यार्थी व युवाशक्तीच्या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना व्यक्त करत या आंदोलनाचा विजय असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, केंद्रीय स्तरावर झालेल्या घडामोडींप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रात समोर येत असलेल्या कथित शालार्थ आयडी घोटाळ्याचीही सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षणमंत्री मा. दादा भुसे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्थेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराबाबत शासनाने पारदर्शक भूमिका घेतली पाहिजे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.जल्लोषावेळी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत घोषणाबाजी केली. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला, तर मेलेडी चॉकलेट वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. उपस्थित शिवसैनिकांनी शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची गरज अधोरेखित करत शासनाने जनभावनांचा आदर करावा, असे आवाहन केले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत, उपजिल्हा संघटक राजू टेलर्स, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, युवासेना शहरप्रमुख बबलू शेख, तालुका समन्वयक पिंटू शिंदे, वाजिद मलिक, महेश चौधरी, मोबीन पठाण, साहिल तेली यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, शालार्थ आयडी प्रकरणी शासनाने तातडीने सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
![]()
