सत्यध्येय एकविचार धुळे प्रतिनिधी :
धुळे शहरातून मालेगावच्या दिशेने गोवंश जातीच्या जनावरांचे मांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी तत्परता दाखवत लळिंग टोलनाक्याजवळ संशयित कार अडवली. वाहनाची पाहणी केली असता डिक्कीत काळ्या ताडपत्रीखाली गोवंश जातीच्या जनावरांच्या मांसाचे तुकडे आढळून आल्याने मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी रोहित चंद्रकांत विंभाडीक (वय ३२, रा. सर्वोदय कॉलनी, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३१ जुलै रोजी सकाळी सुमारे ७ वाजता त्यांना धुळेहून मालेगावच्या दिशेने जांभळ्या रंगाच्या टाटा इंडिको मांझा कारमधून गोवंश मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह लळिंग टोलनाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर सापळा रचला.सकाळी सुमारे ८ वाजता संशयित कार (क्रमांक MH-02-AX-2068) तेथून जात असताना ती थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चालकाने समाधानकारक उत्तरे न दिल्याने वाहनाची पाहणी केली असता डिक्कीत काळ्या ताडपत्रीखाली मोठ्या प्रमाणात मांसाचे तुकडे आढळले. यानंतर डायल ११२ वर संपर्क साधण्यात आला. मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहन व चालकाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले.पोलीस तपासात चालकाचे नाव जावीद शेख सलीम शेख (वय ३१, रा. कबीरगंज, वडजाई रोड, धुळे) असे निष्पन्न झाले. वाहनातील मांस गोवंश जातीच्या जनावरांचे असल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.या कारवाईत अंदाजे २ लाख रुपये किमतीची टाटा इंडिको मांझा कार आणि सुमारे २५० ते ३०० किलो वजनाचे, अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचे गोवंश मांस असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
![]()
