सत्यध्येय एकविचार शहादा | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावत दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या धडाकेबाज कारवाईत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹4 लाख 21 हजार 385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहादा येथील निकेश मोहनसिंग सिसोदिया यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून 27 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि माहितीदारांच्या अचूक मदतीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत इम्रान उर्फ इमू नईम शेख आणि अमन आयजोद्दीन शेख या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.आरोपींकडून ₹2 लाख 61 हजार 385 किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, ₹1 लाखांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली ₹60 हजार किमतीची मोटारसायकल असा एकूण ₹4 लाख 21 हजार 385 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. गुन्ह्याचा जलद छडा लावत आरोपींना गजाआड करण्याच्या या कारवाईमुळे शहादा शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
![]()
