सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील कृषीनगर परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने, तांबे-पितळेची भांडी व सायकल लंपास करणाऱ्या आरोपींचा धुळे शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षित बालकांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्याकडून सुमारे ₹४० हजारांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१(३) व ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादी श्रीमती रतनाबाई युवराज हालोरे (वय ४०, व्यवसाय – गृहिणी, रा. नूतन कृषीनगर, विद्यावर्धिनी कॉलेज मागे, साक्री रोड, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २८ जुलै २०२६ रोजी दुपारी त्या नातेवाईकांकडे गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील लोखंडी दरवाज्याची जाळी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने, तांबे-पितळेची भांडी तसेच सायकल चोरी करून पोबारा केला.गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी तपासाला वेग दिला. गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले आणि डी.बी. पथकाने विविध तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, शनीनगर परिसरातील एका विधीसंघर्षित बालकाचा या घरफोडीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शोध पथकाने संबंधित बालकास त्याच्या पालकांच्या उपस्थितीत ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या दुसऱ्या विधीसंघर्षित साथीदारासह २८ जुलै रोजी दुपारी ही घरफोडी केल्याची कबुली दिली.चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, ३ ग्रॅम सोन्याचे तुकडे, पितळी मोठे पातेले, दोन पितळी प्लेट, तांब्याची भांडी आणि एक काळ्या रंगाची सायकल असा एकूण ₹४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पोलिसांनी दोन्ही विधीसंघर्षित बालकांविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही करून त्यांना प्रमुख बाल न्यायदंडाधिकारी, बाल न्यायालय, धुळे यांच्या समोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.या गुन्ह्याचा जलदगतीने छडा लावण्यात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्यासह डी.बी. पथकातील पोहेकॉ रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, पोलीस कॉन्स्टेबल महेश मोरे, तुषार पारधी, अमोल पगारे, सुदर्शन मोरे, प्रशांत नाथजोगी, धम्मपाल वाघ, शाकिर शेख, हिमांशु ठाकूर, दीपक जगताप, राहुल सरदार, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी पवार, चालक पोहेकॉ पठाण आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल शाहीद शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.धुळे शहर पोलिसांच्या तत्पर तपासामुळे अवघ्या २४ तासांत घरफोडीचा उलगडा होऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
![]()
