सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात युवकाला बेदम मारहाण करून रोख रक्कम लुटणाऱ्या दरोडेखोरांना धुळे शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाने अवघ्या दोन तासांच्या आत जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत दोन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, ₹१ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी प्रसाद चंद्रकांत सरदार (वय १९, रा. भीमनगर, साक्री रोड, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २७ जुलै २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रामनगर परिसरातील युगराज ड्रीम पॅलेसच्या मागील बाजूस आरोपींनी संगनमताने फिर्यादीला काठी, बेल्ट व हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील ₹१० हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली.या प्रकरणात सनी साहेबराव सोनवणे (वय १८), मोहित महेंद्र ठाकूर (वय २१) व एका विधीसंघर्षित बालकाचा सहभाग निष्पन्न झाला.गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी डी.बी. पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत अवघ्या दोन तासांत आरोपींना ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच विधीसंघर्षित बालकानेही आपल्या पालकांच्या उपस्थितीत गुन्ह्यातील सहभाग मान्य केला. कारवाईदरम्यान आरोपींकडून ₹६,५०० रोख रक्कम, ₹७५ हजार किमतीची मोटारसायकल आणि ₹६० हजार किमतीचे चार मोबाईल फोन असा एकूण ₹१,४१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून, विधीसंघर्षित बालकाला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.ही उल्लेखनीय कारवाई सपोनि योगेश धोंगडे यांच्या तपासाखाली पोहेकॉ रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, तुषार पारधी, अमोल पगारे, सुदर्शन मोरे, प्रशांत नाथजोगी, धम्मपाल वाघ, शाकिर शेख, हिमांशु ठाकूर, दीपक जगताप, राहुल सरदार, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी पवार आणि शाहिद शेख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.गंभीर स्वरूपाच्या दरोड्याच्या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांत छडा लावत आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याने धुळे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या तत्परता, अचूक नियोजन आणि प्रभावी तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
![]()
