सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) मोठी कारवाई करत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर (वय ३६) आणि पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे (वय ३१) यांना ₹४० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावावर मौजे बलवाडी, ता. जि. धुळे येथे घर आहे. या घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून धुळे येथील एका दाम्पत्याने सन २०१५ मध्ये फायनान्स कंपनीकडून परस्पर ₹३६.१० लाखांचे गृहकर्ज घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदार यांच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता.या अर्जावर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनी तक्रारदारांकडे ₹५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार ३ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर ₹४० हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.मंगळवारी सापळा कारवाईदरम्यान पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस शिपाई अविनाश सादरे यांनी स्वतः तक्रारदारांकडून ₹४० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ (सुधारित), कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत असून, पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी या कारवाईवर पर्यवेक्षण केले.या कारवाईत पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा तसेच पोलीस कर्मचारी रामदास बारेला, प्रविण पाटील आणि मकरंद पाटील यांनी सहभाग घेतला.ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या धुळे युनिटने यशस्वीरीत्या पार पाडली.
![]()
