सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी :
महसूल दिनानिमित्त शिरपूरचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने चौथ्यांदा सन्मानित करण्यात आल्याबद्दल विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.शिरपूर उपविभागात प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी शरद मंडलिक यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. विशेषतः नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अभिलेख व्यवस्थापनातील सुधारणा आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रशासकीय अधिकारी म्हणून नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही बाब कौतुकास्पद आहे. उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने चौथ्यांदा गौरव होणे ही त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशासकीय कामगिरीची पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती
या अभिनंदन कार्यक्रमास धरतीपुत्र आदिवासी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर वाघ, मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप पवार, मानव विकास पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हिरा वाकडे, वर्चस्व प्रतिष्ठानचे दिनेश कोळी, गणेश वाडीले, मनोज शिरसाठ आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन शरद मंडलिक यांचे अभिनंदन केले. तसेच शिरपूर उपविभागातील सर्वसामान्य नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जलद प्रशासकीय सेवा मिळण्यासाठी त्यांच्या हातून भविष्यातही उल्लेखनीय कार्य घडावे, अशा शुभेच्छा दिल्या.चौथ्यांदा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार प्राप्त झाल्याने शरद मंडलिक यांच्या प्रशासकीय कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत असून, सामाजिक क्षेत्रातून झालेला हा अभिनंदनपर सत्कार त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरला.
![]()
