सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी :
धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत दहशत माजविण्याच्या उद्देशाने विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. नवलनगर, ता. जि. धुळे गावाच्या अलीकडे पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि मोटारसायकल असा एकूण ₹८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक तसेच पोलीस अधीक्षक धुळे यांनी अवैध शस्त्रांचा शोध घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने नवलनगर परिसरात सापळा रचून जगदीश पुंडलीक पाटील (वय २३, रा. पिंपळकोठा, ता. पारोळा, जि. जळगाव) आणि अजय पितांबर भिल (वय १९, रा. पिंपळकोठा, ता. पारोळा, जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून ₹४० हजार किंमतीचा एक देशी गावठी कट्टा (पिस्टल) मॅग्झीनसह, ₹१ हजार किंमतीचे एक जिवंत काडतूस आणि ₹४० हजार किंमतीची MH-54/D-2151 क्रमांकाची मोटारसायकल, असा एकूण ₹८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संबंधितांकडे हे शस्त्र दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विना परवाना बेकायदेशीररीत्या बाळगल्याचा आरोप आहे.या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५८/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत असून, दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.दरम्यान, जप्त करण्यात आलेले अवैध शस्त्र आरोपींपर्यंत नेमके कोणी पोहोचवले, त्याचा मूळ शस्त्र पुरवठादार कोण आहे, तसेच या अवैध शस्त्र व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपी जगदीश पुंडलीक पाटील याच्याविरुद्ध यापूर्वी तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे त्याच्या पूर्वगुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके तसेच पोलीस अंमलदार शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, हेमंत बोरसे, दिनेश परदेशी, योगेश चव्हाण, मच्छिद्र पाटील, देवेंद्र ठाकूर, अतुल निकम, हर्षल चौधरी, सुनील पाटील, अमोल जाधव व सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने केली.
![]()
