सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम टिटवापाणी परिसरात वनविभागाच्या जमिनीवर कपाशीच्या पिकामध्ये कॅनाबीस सदृश्य अंमली पदार्थाची अवैधरित्या लागवड केल्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलिसांनी उघडकीस आणला. दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४८० किलो कॅनाबीस सदृश्य अंमली पदार्थ, अंदाजे २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच लागवड करणारे दोन्ही संशयित शेतातून फरार झाले.पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, प्रभारी अधिकारी, शिरपूर शहर पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अतिदुर्गम टिटवापाणी, पो. चिलारे परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर आणि राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत नियमानुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांना मदन भरतसिंग पावरा (रा. टिटवापाणी, पो. चिलारे, ता. शिरपूर) आणि अमित थावऱ्या पावरा (रा. चितोर, ता. शिरपूर) यांच्या कसणीत असलेल्या वनजमिनीवर कपाशीच्या पिकामध्ये कॅनाबीस सदृश्य अंमली पदार्थाची लागवड आढळून आली.कारवाईत मदन भरतसिंग पावरा याच्या ताब्यातील वनजमिनीवरून ३०० किलो कॅनाबीस सदृश्य अंमली पदार्थ, किंमत १५ लाख रुपये, तर अमित थावऱ्या पावरा याच्या ताब्यातील वनजमिनीवरून १८० किलो कॅनाबीस सदृश्य अंमली पदार्थ, किंमत ९ लाख रुपये असा एकूण ४८० किलो आणि २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही संशयित घटनास्थळावरून पळून गेले. त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. २३३/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८(c), २०(a)(i), २८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार तसेच पोलीस अंमलदार संजय चव्हाण, सागर ठाकूर, संतोष पाटील, संदीप ठाकरे, कैलास कोळी, दिनेश सोनवणे, योगेश मोरे, विजय ढिवरे, सुनील पवार, वाला पुरोहित, धनराज गोपाळ, अल्ताफ मिर्झा आणि इसरार फारुकी यांनी सहभाग घेतला.अतिदुर्गम वनक्षेत्रात सुरू असलेल्या कथित अंमली पदार्थाच्या लागवडीवर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध कॅनाबीस लागवडीविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. फरार दोन्ही संशयितांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
![]()
