सत्यध्येय एकविचार अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील सावखेडा परिसरातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाकडून कसूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे समोर येत आहे.मे २०२६ मध्ये सावखेडा शिवारातील तापी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत पोकलेन मशीन, डंपर, बोटी तसेच मोठ्या प्रमाणात डिझेलसाठा आढळून आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.या कारवाईनंतर महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे निमगव्हाण-तांदळवाडी परिसरातही कारवाई करत अवैध वाळूसाठा जप्त केला. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू केली.अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखणे, गौण खनिजाची चोरी थांबविणे तसेच शासनाच्या महसुलाचे संरक्षण करणे ही महसूल प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांकडून आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई झाली का, याबाबत प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली.प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर संबंधित अहवाल शासनस्तरावर पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते.तहसीलदार सुराणा यांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्याची माहिती आहे. निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
![]()
