सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
शिरपूर शहरातील महात्मा गांधी कॉम्प्लेक्समधील नंदुरबारकर सराफ दुकानातून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या तीन बुरखाधारी महिलांसह कारचालक अशा चौघांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे. CCTV फुटेज आणि FASTagच्या माध्यमातून तपास करत पोलिसांनी सावळदे गावाजवळ आरोपींना पकडले. या कारवाईत ₹6 लाखांचे सोन्याचे दागिने, ₹3 लाखांची Swift Dzire कार आणि दोन मोबाईल असा एकूण ₹9 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी सुरेंद्र सन्मुखलाल सराफ यांच्या दुकानातून तीन बुरखाधारी महिलांनी 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील 8 जोड दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 339/2026, BNS कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या सूचनेनुसार DB पथकाने परिसरातील CCTV फुटेज तपासून आरोपींच्या कारचा क्रमांक मिळवला. FASTagच्या माहितीच्या आधारे कार मालेगावकडून इंदौरच्या दिशेने जात असल्याचे समोर आल्यानंतर सावळदे गावाजवळ सापळा रचून अन्नु ऊर्फ साजिदा बशीर खान (36), मन्नु ऊर्फ मुनसजा शेख गमीर (23), रीजवाना जाकीर शेख (35) या तीन महिला आणि चालक नदिम शेख गयासोद्दिन शेख (42) यांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत चोरीचे दागिने मुंब्रा, ठाणे येथील सराफाकडे विकल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मुंब्रा येथे जाऊन सराफाकडून दागिन्यांची लगड जप्त केली. यात 40.120 ग्रॅम वजनाची अंदाजे ₹6 लाखांची सोन्याची लगड, ₹3 लाखांची कार आणि ₹10 हजारांचे दोन मोबाईल असा एकूण ₹9.10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने आरोपींना 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.यातील अन्नु ऊर्फ साजिदा खान हिच्यावर नागपाडा पोलीस ठाण्यात तीन चोरीचे गुन्हे तसेच कुर्ला पोलीस ठाण्यात BNS कलम 305, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मन्नु ऊर्फ मुनसजा शेख हिच्यावरही कुर्ला पोलीस ठाण्यात याच कलमान्वये पूर्वी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात रविंद्र आखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटु साळुंके, सचिन वाघ, प्रशांत पवार, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, मपोकॉ वर्षा चौधरी, मोहिनी कोकरे, चित्रा पावरा आणि होमगार्ड मिथुन पवार यांचा सहभाग होता.
![]()
