सत्यध्येय एकविचार धुळे प्रतिनिधी:
धुळे शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात धडक कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत ०.६९ ग्रॅम व ०.३३ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) सदृश्य पदार्थ, FZ मोटारसायकल तसेच देशी-विदेशी मद्यसाठा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम मोटारसायकलवरून एम.डी. हा अंमली पदार्थ अवैध विक्रीच्या उद्देशाने घेऊन येत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक भामरे यांनी तातडीने डी.बी. पथक तयार केले.पोलिसांनी गणेश मंदिरापासून पश्चिमेस पांझरा नदीकिनारी असलेल्या सर्व्हिस रोडवरील बौद्ध विहाराजवळ सापळा रचला. काही वेळाने माहितीप्रमाणे FZ ग्रे-हिरव्या रंगाच्या मोटारसायकलवरून एक इसम येताना दिसला. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आपले नाव कुणाल भिमराव वारुडे (वय २७, रा. प्लॉट नं. १३ सी, जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे) असे सांगितले.कुणाल वारुडे याची अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता त्याच्या शर्टच्या खिशातील एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. तपासणीत ती एम.डी. ड्रग्ज सदृश्य असल्याचे निष्पन्न झाले. सदर पदार्थाबाबत अधिक चौकशी केली असता हा माल दिपक शंकर कापूरे (रा. वाडीभोकर गाव, मराठी शाळेजवळ, ता. जि. धुळे) याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले.त्यानंतर पोलिसांनी दिपक कापूरे याच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. घरझडतीदरम्यान त्याच्या घरातून एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाची एम.डी. ड्रग्ज सदृश्य पावडर आढळून आली. याशिवाय घरातून देशी व विदेशी मद्यसाठाही जप्त करण्यात आला.पोलिसांनी केलेल्या कारवाईत ०.६९ ग्रॅम एम.डी. सदृश्य पदार्थाची अंदाजे किंमत ₹५ हजार, FZ मोटारसायकलची अंदाजे किंमत ₹३० हजार, ०.३३ ग्रॅम एम.डी. सदृश्य पदार्थाची अंदाजे किंमत ₹२,५००, तसेच देशी टँगो पंच कंपनीच्या ९० मिलीच्या ८२ बाटल्या आणि व्हाईट कॉच व्होडका कंपनीच्या १८० मिलीच्या ४ बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणामुळे एम.डी. पदार्थाच्या पुरवठा व विक्रीच्या साखळीचा तपास करण्याला महत्त्व प्राप्त झाले असून, हा पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी केले. प्रकरणाचा पुढील तपास मसपोनि पल्लवी एस. टले करीत आहेत. जप्त पदार्थांचे अंतिम स्वरूप व त्याबाबतचे निष्कर्ष पुढील तपासानंतर स्पष्ट होतील.धुळे शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
![]()
