सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :
शहरातील अनेक नागरिकांना मागील काही महिन्यांपासून त्यांच्या नेहमीच्या वापराच्या तुलनेत अवाजवी आणि दुप्पट-तिप्पट वाढीव वीजबिले मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण प्रशासनाला कडक इशारा देणारे निवेदन देण्यात आले. शहरासाठी १३२ केव्ही उपकेंद्र तात्काळ मंजूर करावे, अन्यथा महावितरण कार्यालयावर धडक देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.काँग्रेसचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले. सदर निवेदन सहाय्यक अभियंता अभिजीत अहिरे यांनी स्वीकारले. याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक अहिरे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगरसेवक दीपक माळी, वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे, काँग्रेसचे परीक्षेत देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेवर शंका
नागरिकांनी वीजबिलाबाबत महावितरण कार्यालयात वारंवार खेटे मारूनही कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर अथवा सहकार्य मिळालेले नाही. शहरात बसवण्यात आलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’च्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी तीव्र शंका उपस्थित केली आहे. इनपोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशन रीडिंगमध्ये मोठी तफावत दिसून येत असून, या मीटरची वरिष्ठ पातळीवरून तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.वीज उपकरणांचे नुकसान अन् शेतकऱ्यांची पिळवणूकशहरात दररोज होणारा विजेचा खेळखंडोबा, वारंवार तुटणाऱ्या वीजवाहिन्या आणि व्होल्टेजमधील चढ-उतारामुळे घरातील महागडी विजेची उपकरणे जळून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे, शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र केवळ चार ते पाच तासच वीज दिली जात आहे. यामुळे बळीराजाही पुरता हवालदिल झाला आहे.
प्रमुख मागण्या:
सक्तीच्या वसुलीला स्थगिती* : वाढीव वीजबिलांच्या तक्रारींची चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीची वसुली किंवा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करू नये.
दुरुस्त बिलांचे वाटप: अवाजवी व चुकीची बिलं तात्काळ दुरुस्त करून प्रत्यक्ष वापरानुसार सुधारित बिलं देण्यात यावीत.विशेष पथकाची नियुक्ती:तक्रारींच्या जलद निवारणासाठी विशेष अधिकारी व पथकाची तातडीने नियुक्ती करावी.
१३२ केव्ही उपकेंद्र : शहराला नियमित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी १३२ केव्ही उपकेंद्राची तात्काळ उभारणी करावी.या सर्व मागण्यांवर महावितरण प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
![]()
