सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा सुरू असताना झालेला दुर्दैवी मृत्यू हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे सांगत शिरपूर तालुका सरपंच परिषद व सरपंच सेवा महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली.ग्रामसभा सुरू असताना काही युवकांनी गोंधळ घातल्याची आणि अपूर्ण माहितीच्या आधारे बेछूट आरोप केल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पी. एन. पाटील यांचा मृत्यू झाल्याने ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक बैठकीत कायदा हातात घेणे, अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे, धमकी देणे अथवा हिंसक वर्तन करण्याचा अधिकार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाला शिरपूर तालुका सरपंच परिषद व सरपंच सेवा महासंघाने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. ग्रामस्थांना आपल्या समस्या व प्रश्न मांडण्याचा अधिकार असला तरी तो कायदेशीर व शिस्तबद्ध पद्धतीनेच वापरला गेला पाहिजे. ग्रामसभा ही लोकशाहीची महत्त्वाची संस्था असून तिचे वातावरण गोंधळाचे किंवा हिंसक होणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे.ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच आणि सदस्यांवर शिवीगाळ, धमकी, अंगावर धावून जाणे, मारहाणीचा प्रयत्न तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर गावातील समस्या किंवा ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे एकतर्फी चित्रण करून गावाची व पदाधिकाऱ्यांची नाहक बदनामी करणाऱ्या प्रकारांचीही चौकशी व्हावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.पी. एन. पाटील यांच्या मृत्यूची निष्पक्ष व सखोल चौकशी करून घटनेला जबाबदार असणाऱ्यांची भूमिका तपासावी आणि पुरावे व चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारे लागू कायद्यांनुसार कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली. भविष्यात ग्रामसभांमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी ग्रामसभा सुरू असताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि शिस्तीचे पालन सुनिश्चित करण्याची मागणीही करण्यात आली.निवेदनावर सरपंच परिषद अध्यक्ष हेमंत पाटील, सरपंच सेवा महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, अहिल्यापूरचे सरपंच संग्रामसिंग राजपूत, वाघाडीचे सरपंच किशोर माळी, तोंदेचे सरपंच राहुल चौधरी, जुने भामपूरचे सरपंच पप्पू पाटील, अर्थ बु.चे सरपंच मनोहर पाटील, शिंगावेचे माजी सरपंच चंद्रकांत पाटील, उंटावदचे सरपंच राजकापूर मराठे, हिंगोणीचे सरपंच सोमा भिल, भामपूरचे सरपंच बाळासाहेब पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
![]()
