कापडणे : ग्रामपंचायतीमार्फत सुमारे ₹17 लाख खर्च करून उभारण्यात आलेला आरो फिल्टर प्लांट वर्षभर उलटूनही नागरिकांच्या सेवेत सुरू न झाल्याचा आरोप करत स्वच्छ पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने ‘घागर नळाला लाव’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या सुरुवातीला फिल्टर प्लांटचे पूजन करून त्याला फुलहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्लांटच्या नळाला प्रतीकात्मक घागर लावत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. ‘पाणी आमचा अधिकार आहे, उपकार नाही’, ‘स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.स्वच्छ पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले असून, त्यावेळी संबंधितांकडून फिल्टर प्लांट एका महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही हे आश्वासन पूर्ण झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्लांटच्या कामाला सुरुवात झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, प्लांटच्या काही मोटारी जळालेल्या असल्याचे समोर आले असून दुरुस्तीचे काम सुरू असताना एका कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याची घटनाही घडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.फिल्टर प्लांट सुरू करण्यापूर्वी तांत्रिक, विद्युत व यंत्रसामग्रीची संपूर्ण तपासणी करावी तसेच प्लांटमधील पाण्याची अधिकृत व सक्षम प्रयोगशाळेतून गुणवत्ता तपासणी करून ते पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आणि विलंबाचे कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, अशीही मागणी करण्यात आली.दरम्यान, आंदोलनस्थळी संबंधित अधिकारी व ठेकेदार उपस्थित राहून फिल्टर प्लांटची सद्यस्थिती स्पष्ट करतील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र एकही संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून प्लांट सुरू करण्याबाबत ठोस कार्यवाही करत नाहीत, तोपर्यंत पाणीप्रश्न सुटलेला मानला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.या आंदोलनात नवल अण्णा पाटील, विश्वासराव देसले, दिनकर पाटील, कवी दिलीप पाटील, सदानंद पाटील, मनोहर माळी, चंदू पाटील, ललित बोरसे, ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर पाटील, भटू वाणी, भूषण ब्राम्हणे, श्याम पाटील, देवेंद्र पाटील, आकाश कुंभार, दुर्गेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.₹17 लाखांचा खर्च झालेला प्रकल्प वर्षभर नागरिकांच्या उपयोगात का आला नाही? प्लांट कधी सुरू होणार आणि कापडणेकरांना शुद्ध व नियमित पाणी कधी मिळणार? याबाबत प्रशासनाच्या भूमिकेकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
![]()
