सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
शिरपूर तालुक्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू व्हावे, यासाठी गेल्या तब्बल ३३ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले. यावेळी मुंबई, नागपूर, संभाजीनगर उच्च न्यायालयातील मान्यवर न्यायमूर्ती तसेच धुळे सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची प्रमुख उपस्थिती होती.न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते नवीन बैठक सभागृह, ग्रंथालय कक्ष, वकील संघाचा कक्ष, न्यायालयाचा नूतन नामफलक तसेच परिसरातील विविध आस्थापनांच्या फलकांचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलातील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात येऊन नूतन न्यायालयीन सुविधांच्या लोकार्पणाची अधिकृत घोषणा करण्यात आली.यावेळी न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी आपल्या मनोगतात सामाजिक, राजकीय आणि न्यायिक क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. न्यायव्यवस्था आणि समाजातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करताना शिरपूर शहराशी लहानपणापासून असलेले ऋणानुबंध त्यांनी आवर्जून सांगितले. शिरपूरमध्ये येऊन या ऐतिहासिक न्यायालयीन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी व्यक्त केले.३३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साकारलेले हे न्यायालय शिरपूरच्या न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक पर्व मानले जात असून, नूतन सुविधांमुळे नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक न्यायालयीन सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
![]()
