सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील चौगाव शिवारातील साल्या-माल्या डोंगराच्या पायथ्याशी बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या अवैध अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. Royal Stag Deluxe Whiskyच्या नावाने बनावट दारू तयार करून तिची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले. या कारवाईत Royal Stagच्या १८० एमएल क्षमतेच्या बनावट दारूच्या ४७ बाटल्या, सुमारे २३ लिटर बनावट दारूचे द्रावण, बुच लावण्याचे मशीन, विविध ब्रँडचे बुच, Whisky Flavour, synthetic food colour, दोन Alcoholmeter आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा एकूण ₹४४,७८१ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना २१ ऑगस्ट २०२६ रोजी चौगाव शिवारात बनावट दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पथकाने शेत गट क्रमांक ३०६ मधील कांद्याच्या चाळीजवळील खोलीवर छापा टाकला. तेथे बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले.पोलिसांनी McDowell’s No.1 Whiskyचे सुमारे २८२ बुच, Royal Stagचे सुमारे १५० बुच, तसेच प्लास्टिक ड्रम, बादल्या, पाण्याचा जार, नरसाळे, मोजपात्र, गाळणी, पारदर्शक नळी आदी साहित्यही जप्त केले. कारवाईदरम्यान विशाल दगडू गो-हेकर (गवळी), रा. चितोड रोड, धुळे हा संशयित आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ), ६५(ब), ६५(क), ६५(ई) व ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दारूचा पुरवठा व विक्रीचे जाळे, तसेच या कारखान्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नागरिकांनी अशा अवैध दारू निर्मिती किंवा विक्रीची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
