साक्री : मानवी आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या बनावट विदेशी दारूच्या अवैध साठ्यावर धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB व साक्री पोलिसांच्या संयुक्त पथकाने 23 ऑगस्ट 2026 रोजी लखडेवाळ येथे छापा टाकला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लाल रंगाच्या टाटा टर्बो वाहन क्रमांक MH-08/H-2109 मध्ये बनावट विदेशी दारूचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. कारवाईदरम्यान राकेश धनलाल भोये (वय 26, रा. धनकवडी, पारगाव, ता. साक्री) याच्या ताब्यातील वाहनातून Royal Blue Malt Whiskyच्या 180 मिलीच्या 655 खोक्यांमध्ये एकूण 31,440 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. जप्त दारूची किंमत ₹62 लाख 88 हजार, तर टाटा टर्बो वाहनाची किंमत ₹10 लाख, असा एकूण ₹72 लाख 88 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गु.र.नं. 250/2026 अन्वये BNS कलम 123, 336 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, बनावट दारूच्या साठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. बनावट विदेशी दारूच्या काळ्या बाजारावर पोलिसांचा मोठा घाव बसला असून ₹72.88 लाखांचा मुद्देमाल जप्त झाल्याने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
![]()
