सत्यध्येय एकविचार नंदुरबार प्रतिनिधी :
शहादा तालुक्यातील कोठावळ बीटशी संबंधित ₹१७ हजारांच्या लाचप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आणखी एका संशयिताला अटक केली आहे. वनपाल संजय पवार (वय ५२) याला मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजता शहादा बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली. एसीबीच्या पडताळणीदरम्यान त्याची भूमिका समोर आल्याचे तपास यंत्रणेने सांगितले आहे. या प्रकरणात यापूर्वी वनरक्षक तेजस्विनी साळुंखे (पाटील), वय ३४, हिच्यावर ₹१७ हजारांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती.प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराने ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन शेताच्या बांधावरील तसेच माळरानावरील काटेरी बाभळीची झाडे तोडून टाटा मॅजिक वाहनातून गुजरातमध्ये विक्रीसाठी नेली होती. मार्च ते मे २०२६ या कालावधीत अशा प्रकारे झाडे वाहून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाहनावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ₹१७ हजारांची लाच मागितल्याचा आरोप वनरक्षक तेजस्विनी साळुंखे हिच्यावर करण्यात आला. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करून शहादा–शिरपूर रस्त्यावर सापळा रचण्यात आला आणि लाचप्रकरणी साळुंखे हिच्यावर कारवाई करण्यात आली.यानंतर तपासादरम्यान वनपाल संजय पवार याची कथित भूमिका एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार मंगळवारी रात्री शहादा बसस्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या अटकेमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, लाचेच्या मागणीपासून कथित व्यवहारापर्यंत आणखी कोणाची भूमिका होती का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६१/२०२६, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पुढील तपास एसीबी, नंदुरबारकडून सुरू आहे. कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत भिमराव भरते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात विलास पाटील, नरेंद्र पाटील, विजय ठाकरे, जितेंद्र महाले, संदीप खंडारे यांच्यासह एसीबीचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होते. धुळे एसीबीच्या रेश्मा परदेशी यांनीही कारवाईत सहभाग घेतला.संजय पवारच्या चौकशीत या प्रकरणातील कथित लाचेची साखळी आणि आणखी कोणाची भूमिका समोर येते का, याकडे आता लक्ष लागले आहे.
![]()
