सत्यध्येय एकविचार
धुळे : वाहनधारकांकडून टोलची वसुली नियमित सुरू असताना धुळे–मुंबई मार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्था समोर आली आहे. धुळे शहराजवळील आर्वी परिसरातील आग्रा–मुंबई महामार्गावर रस्त्याच्या पृष्ठभागाची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे. ठिकठिकाणी डांबरी थर उखडलेला, रस्ता खचलेला आणि वाहनांच्या टायरच्या सततच्या वर्दळीमुळे पृष्ठभागावर खराबी निर्माण झालेली दिसत आहे.विशेष म्हणजे, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल आकारला जातो. मग टोल वसुलीच्या तुलनेत महामार्गाची देखभाल आणि दुरुस्ती योग्य पद्धतीने का होत नाही? टोल भरूनही वाहनधारकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणार नसेल, तर या व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची? टोल भरायचा, मग सुरक्षित रस्ता मिळणार कधी? असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदार/कन्सेशनअरची असल्यास त्यांच्याकडून नियमित देखभाल केली जाते का? रस्त्यावर खराबी निर्माण झाल्यानंतर तिची दुरुस्ती किती वेळेत करणे अपेक्षित आहे? संबंधित अधिकाऱ्यांकडून रस्त्याची नियमित पाहणी केली जाते का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकीस्वार, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
महामार्ग की खड्डेमार्ग?
धुळे–मुंबई मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना रस्त्याची अशी अवस्था राहणे ही केवळ वाहनधारकांची गैरसोय नसून रस्ता सुरक्षा आणि सार्वजनिक जबाबदारीचा प्रश्न आहे. त्यामुळे NHAI, संबंधित कंत्राटदार/कन्सेशनअर आणि टोल प्रशासनाने संयुक्तपणे पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.टोल वसुली सुरू ठेवायची, तर रस्ता सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कोण घेणार?हा प्रश्न आता वाहनधारकांकडून थेट NHAI आणि टोल प्रशासनाला विचारला जात आहे.
![]()
