सत्यध्येय एकविचार शिंदखेडा प्रतिनिधी :
शेतातील विहिरीमधून पाण्याची मोटर अर्थात ‘जलपरी’ चोरून नेणाऱ्या दोघांना शिंदखेडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीची ५ एचपी पाण्याची मोटर, दोन मोबाईल हँडसेट आणि गुन्ह्यात वापरलेली रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० बुलेट असा एकूण १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.चिमठावळ, ता. शिंदखेडा येथील शिवारात ही चोरी झाली होती. फिर्यादी जिभाऊ बाबराव पाटील यांच्या शेतातील विहिरीमधील पाण्याची मोटर १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१६/२०२६, BNS कलम ३०३(२), ३(५) अन्वये १६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर रोहित संजय तडवी (वय २१) आणि जयपाल नानाभाऊ गिरासे (वय २१), दोघेही रा. चिमठावळ, ता. शिंदखेडा, यांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोन्ही संशयितांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरीची ५ एचपी क्षमतेची पाण्याची मोटर, दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली विना नंबरप्लेट रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० बुलेट असा एकूण १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईमुळे शिंदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेतातील विहिरीतील पाण्याची मोटर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत.
![]()
