सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी:
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनापाणी परिसरात वनविभागाच्या जमिनीवर कपाशीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे १५० किलो वजनाचा कॅनाबीस सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ७ लाख ५० हजार रुपये आहे. या प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला असून, दुसरा संशयित पोलिसांना पाहून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत जुनापाणी परिसरातील अतिदुर्गम भागात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार राजाराम नकाराम पावरा व विकास नकाराम पावरा, दोघेही रा. जुनापाणी, ता. शिरपूर, जि. धुळे यांनी कपाशीच्या पिकामध्ये प्रतिबंधित कॅनाबीस वनस्पतीची लागवड केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची परवानगी घेतल्यानंतर दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच पोलीस पथकासह दुपारी सुमारे २.३० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.कारवाईदरम्यान घटनास्थळावरून विकास नकाराम पावरा यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पोलिसांचे पथक घटनास्थळी आल्याचे पाहून राजाराम नकाराम पावरा हा पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.छाप्यात अंदाजे १५० किलो वजनाची हिरवी, ओली व ताजी कॅनाबीस वनस्पती जप्त करण्यात आली. या वनस्पतींना पाने, फुले, फांद्या व मुळांसह जप्त करून त्यांचे प्रत्येकी ३० किलो वजनाचे पाच गठ्ठे तयार करण्यात आले. हे गठ्ठे कापडात भरून दोरीने बांधून सिलबंद करण्यात आले असून, त्यांना पी-१ ते पी-५ असे क्रमांक देण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ७ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं. २३५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(अ)(i) व २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.कारवाईत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, स्वप्निल बांगर, विजय हिवरे, संजय भोई, सुनील पवार, दिनकर पवार, धनराज गोपाळ, मनोज नेरकर, अल्ताफ मिर्झा आणि इसरार फारुकी यांनी सहभाग घेतला.अतिदुर्गम भागात गांजाची लागवड करून अंमली पदार्थाच्या अवैध व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, या प्रकरणातील फरार आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा अधिक तपास करीत आहे.
![]()
