सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
रुदावली, ता. शिरपूर, जि. धुळे : रुदावली ग्रामपंचायतीअंतर्गत विविध शासकीय निधी व योजनांतून करण्यात आलेल्या विकासकामांच्या दर्जाबाबत आणि निधीच्या वापराबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी, तांत्रिक तपासणी तसेच संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात रुदावलीतील पाणीपुरवठा व्यवस्था, पाण्याची टाकी व परिसर, जलसंधारणाची कामे, भूमिगत गटार-नाली, पाणी फिल्टर, रस्ते, नाली, जिल्हा परिषद शाळेतील कामे तसेच इतर विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा दर्जा तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः मंजूर अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्ष काम झाले आहे का, कामाची मोजमाप पुस्तिका व प्रत्यक्ष स्थितीमध्ये तफावत आहे का, बिल-देयके कोणत्या आधारावर अदा करण्यात आली आणि पूर्णत्व प्रमाणपत्र कोणत्या निकषांवर देण्यात आले, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.रुदावली येथे जिल्हा वार्षिक समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राच्या कामावर विशेष आक्षेप नोंदविण्यात आला आहे. माहिती फलकानुसार या कामासाठी सुमारे ₹९.९९ लाखांचा निधी खर्च झाल्याचे नमूद आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही यंत्रणा अपेक्षित पद्धतीने कार्यरत नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच संबंधित बांधकामाचा दर्जाही समाधानकारक नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यंत्रणेची कार्यक्षमता, बांधकामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य आणि प्रत्यक्ष खर्च यांची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय गावातील भूमिगत गटार/नालीच्या कामाबाबतही निकृष्ट बांधकामाचा आरोप करण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे ₹२.९९ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे निवेदनात नमूद आहे. या कामाची प्रत्यक्ष मोजणी करून मंजूर अंदाजपत्रकाशी तुलना करण्यात यावी. तसेच मोजमाप पुस्तिका, बिल-देयके, मंजुरी आदेश, कामाचे आदेश आणि पूर्णत्व प्रमाणपत्राची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.रुदावली जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या Rain Water Harvesting अर्थात पावसाचे पाणी साठवण प्रकल्पावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कामासाठी अंदाजे ₹२,४९,६३२ निधी खर्च झाल्याचे नमूद आहे. प्रकल्प प्रत्यक्षात कार्यरत आहे का, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था योग्य प्रकारे उभारण्यात आली आहे का, तसेच मंजूर आराखडा व अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण झाले आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत कामांची मोजणी व गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB), कामाचे आदेश, साहित्य खरेदीची कागदपत्रे, बिल-देयके, पूर्णत्व प्रमाणपत्र आणि निधी खर्चाचा संपूर्ण तपशील तपासण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.चौकशीत विकासकामांमध्ये अनियमितता, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, मंजूर कामापेक्षा कमी काम किंवा निधीच्या वापराबाबत तफावत आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी किंवा ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, निवेदनात करण्यात आलेले आरोप हे चौकशीअंती स्पष्ट होणारे असून, संबंधित कामांबाबत प्रशासनाची अधिकृत तांत्रिक तपासणी व अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे रुदावलीतील विकासकामांच्या गुणवत्तेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांना पंचायत समिती प्रशासनाकडून काय उत्तर मिळते आणि प्रत्यक्ष चौकशी कधी सुरू होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
![]()
