सत्यध्येय एकविचार धुळे प्रतिनिधी :
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात भांगजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी MP-09/GG-3199 क्रमांकाचा अशोक लेलँड कंटेनर पकडला. कंटेनरची झडती घेतल्यानंतर तब्बल १७५ किलो भांगच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. जप्त भांगजन्य पदार्थाची किंमत सुमारे ४ लाख रुपये, तर कंटेनरची किंमत सुमारे १५ लाख रुपये असून, पोलिसांनी एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना १६ ऑगस्ट २०२६ रोजी मध्य प्रदेशातून धुळ्याच्या दिशेने मादक पदार्थांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाईचे नियोजन केले. न्यायवैद्यक शास्त्र विभागातील तज्ज्ञ व पंचांना सोबत घेत पोलिसांनी सोनगीर टोलनाक्यावर सापळा रचला.संशयित कंटेनर टोलनाक्यावर येताच पोलिसांनी तो अडवून तपासणी केली. यावेळी पाच प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये दहा कागदी खोक्यांचा साठा आढळून आला. या खोक्यांमध्ये एकूण २०० डबे असून, प्रत्येक डब्यात सुमारे ८७५ ग्रॅम पदार्थ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व डब्यांमधून सुमारे १७५ किलो भांगच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.या कारवाईत कंटेनर चालक मोहम्मद साबीर मुशरफ खान (वय ४७, रा. पवनपुरी पालदा, इंदूर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या डब्यांवर ‘आयुर्वेदिक चूर्ण’, ‘पाचक वटी चूर्ण गोळी’ अशा स्वरूपाची लेबले लावण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे मादक पदार्थाची खरी ओळख लपवून त्याची आयुर्वेदिक पदार्थाच्या नावाखाली वाहतूक अथवा विक्री करण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.या प्रकरणात मेहता आयुर्वेदिक संस्थान, सनन हाऊस, इंदूर (मध्य प्रदेश) तसेच इरफान मकबूल शेख, रा. अहिल्यानगर यांची नावे समोर आल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनगीर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८०/२०२६ अन्वये BNS मधील संबंधित कलमांसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्य प्रदेशातून एवढ्या मोठ्या प्रमाणात भांगच्या गोळ्या महाराष्ट्रात कोणासाठी आणल्या जात होत्या, त्यांची विक्री नेमकी कुठे होणार होती, या मालामागे आर्थिक व्यवहार कोणाचा होता आणि या तस्करीच्या साखळीत आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईतून केवळ वाहतूकदारच नव्हे, तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार आणि अंतिम खरेदीदारापर्यंतची संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सपोनि. दीपक ढोके तसेच पोलीस अंमलदार सतीश जाधव, राहुल सानप, आरिफ पठाण, शिरोष भदाणे आणि सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने केली.
![]()
