सत्यध्येय एकविचार धुळे प्रतिनिधी :
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात धुळे तालुका पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. 24 जुलै 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हॉटेल उदय काठियावाडी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत दोन वाहनांमधून तब्बल 44,050 पॅकेट्सचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची एकूण किंमत ₹50 लाख 54 हजार 900 रुपये असल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल उदय काठियावाडीच्या परिसरातून दोन वाहनांमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला वाहतूक केला जात असल्याची माहिती संबंधित पथकाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पथकाने संशयित वाहनांवर लक्ष ठेवत MH-04-JK-6975 आणि GJ-26-T-4538 या दोन वाहनांची तपासणी केली.तपासणीदरम्यान वाहनांमध्ये प्रतिबंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. त्यानंतर दोन्ही वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी धुळे तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आला. तपासणी व मोजणी केल्यानंतर एकूण 44,050 पॅकेट्स, किंमत ₹50,54,900 इतका साठा असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी कल्पेशभाई मनुभाई गामीत, गुलाब चिवल्या गामीत, देविया दिवाणजी गामीत आणि दाऊद विलीनभाई गामीत, सर्व रा. सीनोद, ओटा, सोनगड, तापी, गुजरात, यांच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा नेमका कुठून आणण्यात आला, तो कोणाकडे पोहोचविला जाणार होता तसेच या वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस आणि संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईतून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या संभाव्य पुरवठा साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.ही कारवाई अन्न आयुक्त नाशिक मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) धुळे गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, सुवर्णा महाजन आणि अरविंद राऊत यांनी केली. मोठ्या प्रमाणातील प्रतिबंधित साठा जप्त झाल्याने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
![]()
