सत्यध्येय एकविचार जळगाव प्रतिनिधी :
जळगाव : जिल्ह्यात बंद घरांना लक्ष्य करून घरफोडी करण्याचे सत्र सुरूच असून, जळगाव शहरातील रामानंदनगर तसेच मेहुणबारे (चाळीसगाव) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण सुमारे २ लाख ८३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.
जळगाव शहरातील त्र्यंबकनगर परिसरातील रहिवासी प्रकाश गजानन साखरे (वय ४८) हे १६ ते २१ ऑगस्टदरम्यान घराबाहेर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच १ लाख २५ हजार रुपयांची रोकड, असा एकूण २ लाख २२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना मेहुणबारे (चाळीसगाव) येथे घडली. निर्मला यशवंत महाजन (वय ४८, व्यवसाय शेती) यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ६१ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. यात नेकलेस, सोन्याची साखळी आणि सोन्याच्या तुकड्याचा समावेश आहे.दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, बंद घरांची सुरक्षा आणि रात्रीच्या गस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनांची नोंद करून तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. नागरिकांनी घराबाहेर जाताना मौल्यवान वस्तू व मोठी रोकड घरात न ठेवता सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
![]()
