सत्यध्येय एकविचार चाळीसगाव प्रतिनिधी :
शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण, अनावश्यक कर्णकर्कश हॉर्न आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांनी धडक मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. २१ ऑगस्ट २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १० वाहनधारकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवून वाहन चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाढणारी वाहतूक, नागरिकांना होणारा त्रास आणि अनावश्यक ध्वनी प्रदूषण याची दखल घेत चाळीसगाव शहर पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली. खरजई नाका, भडगाव रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नागद चौफुली या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते तसेच शहर वाहतूक शाखेच्या विशेष पथकाने ही मोहीम राबवली.या कारवाईदरम्यान अनावश्यक व कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या १० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, आगामी काळातही अशी तपासणी आणि कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
‘हॉर्नचा गैरवापर बंद करा’; पोलिसांचे आवाहन
वाहन चालविताना अनावश्यक हॉर्नचा वापर करू नये, वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करू नयेत, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरू नयेत तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी केले आहे.नागरिकांच्या शांततेला आणि सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या वाहनधारकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा चाळीसगाव शहर पोलिसांनी दिला आहे.
![]()
