सत्यध्येय एकविचार यावल | प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात महावितरणच्या विद्युत वाहिन्यांवरील ॲल्युमिनियमच्या तारा तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंपांची कॉपर केबल चोरी करणाऱ्या कथित टोळीचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १० संशयितांना अटक करण्यात आली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या कारवाईत ६ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्युत वाहिन्यांवरील ॲल्युमिनियम तारा आणि शेतातील पंपांच्या कॉपर केबल चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक अशोक सराफ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिसांनी तपास सुरू केला.यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजन गवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून माहिती संकलित केली. तपासादरम्यान सपक हसन तडवी (वय ३४, रा. माळोद, ता. यावल) याच्यासह अन्य संशयितांची नावे समोर आली. पोलिसांच्या तपासानुसार, यावल परिसरातील विद्युत वाहिन्यांवरील ॲल्युमिनियमच्या तारा तसेच शेतातील विहिरींवरील पंपांची कॉपर केबल चोरी केल्याची माहिती समोर आली.या प्रकरणात करीम नशीर तडवी, अल्लाउद्दीन मुजाहीद तडवी, आरिफ मुस्तफा तडवी, अफसर अकबर तडवी, खुबाबखान रशीद तडवी, विनोद मेहरबान तडवी, हैदर बसारत तडवी आणि सलीम भिका तडवी यांच्यासह अन्य संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच चोरीचा माल खरेदी केल्याचा संशय असलेल्या आरिफ युसूफ मणियार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकासही कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी कारवाईदरम्यान सुमारे १७५ किलो ॲल्युमिनियमची तार, २७० किलो ॲल्युमिनियम विद्युत वाहिनीच्या तारांचे तुकडे, सबमर्सिबल मोटारपंप, २०० फूट लांबीची कॉपर केबल आणि तार कापण्यासाठी वापरले जाणारे कटर जप्त केले आहेत. याशिवाय चोरीसाठी वापरल्याचा संशय असलेली स्विफ्ट कार आणि बजाज प्लॅटिना मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.जप्त केलेल्या या सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ६ लाख ४२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे यावल परिसरातील वीजवाहिन्या आणि शेतपंपांच्या केबल चोरीच्या आणखी घटनांचा तपास लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, चोरीचा माल नेमका कुठे विकला जात होता, तो खरेदी करणाऱ्या आणखी व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग आहे का, तसेच संशयितांचा यापूर्वी घडलेल्या तत्सम चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.यावल पोलिसांच्या या कारवाईमुळे ग्रामीण भागातील विद्युत साहित्य चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती हाती लागली असून, प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.
![]()
