सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :
शिंदखेडा तालुक्यात अवेळी पाऊस आणि पावसाच्या खंडांमुळे खरीप पिके पूर्णपणे जळून गेली आहेत. असे असतानाही, प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात न जाता केवळ एसी केबिनमध्ये बसून ५० पैशांपेक्षा जास्त (५१%) आणेवारी दाखवली आहे. या चुकीच्या आकडेवारीमुळे तालुका दुष्काळ जाहीर होण्यापासून वंचित ठेवला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) वतीने करण्यात आला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणी केली आणि शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला.

प्रत्यक्ष पाहणीविना कागदी घोडे नाचवल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील विविध मंडळ भागातील शेतात प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात कपाशी, मका, भुईमूग, बाजरी आणि ज्वारी यांसारख्या पिकांची वाढ खुंटल्याचे व पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे भयानक चित्र समोर आले.या पाहणीदरम्यान शेतकरी नाना चौधरी यांनी आपली आपबीती सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून, त्याच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही, असा संतप्त व हवालदिल सूर शेतकऱ्यांनी लावला. या संपूर्ण परिस्थितीस शासन आणि प्रशासन जबाबदार असल्याचा घणाघात पदाधिकाऱ्यांनी केला.तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणे अपेक्षित असताना, कागदोपत्री चुकीचे अहवाल तयार करून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जर प्रशासनाने यात सुधारणा करून फेरपाहणी केली नाही, तर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने तहसील कार्यालयावर तीव्र मोर्चा आणि आंदोलन काढण्यात येईल, असा इशारा नेत्यांनी दिला आहे.या शेतकरी संवाद व पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, माजी नगरसेवक अरुण देसले, शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, तालुका कार्याध्यक्ष देविदास मोरे यांच्यासह शेतकरी नाना चौधरी, आबा धोबी, प्रकाश आबा मराठे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
![]()
