सत्यध्येय एकविचार धुळे प्रतिनिधी :
दुकानाचा गाळा घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चायनीज स्टॉलवर काम करणाऱ्या व्यक्ती व त्याच्या भावाला कथित शिवीगाळ व मारहाण करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून फायरिंग केल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणात वैभव ऊर्फ गोलू संजय मेकले (वय २४) आणि भुपेश ऊर्फ भूषण तिलकसिंग लोधी (वय २३), दोघे रा. अमरनगर, मनोहर टॉकीजमागे, धुळे, यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा, मॅगझीन आणि एक जिवंत राऊंड असा एकूण सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास धुळे शहरातील मनोहर टॉकीजजवळ नाटेश्वर इलेक्ट्रिक दुकानासमोरील चायनीज स्टॉलवर हा प्रकार घडला. फिर्यादी हरपाल दीपक गवळी हे चायनीज स्टॉलवर विक्रीचे काम करीत असताना दुकानाचा गाळा घेण्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना व त्यांच्या भावाला कथितरीत्या शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून राऊंड फायर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.मनोहर टॉकीज परिसर गजबजलेला असल्याने कथित फायरिंगच्या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली.दरम्यान, आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वैभव ऊर्फ गोलू मेकले आणि भुपेश ऊर्फ भूषण लोधी यांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरल्याचा आरोप असलेला गावठी कट्टा मॅगझीनसह आणि एक जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये गावठी कट्टा मॅगझीनसह अंदाजे ४० हजार रुपये आणि एक जिवंत राऊंड अंदाजे एक हजार रुपये, असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, वैभव संजय मेकले ऊर्फ गोलू मेकले याच्याविरुद्ध आझादनगर तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी विविध कलमांखाली गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच भावेश अनिल कौलस्कर याच्याविरुद्धही आझादनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित पूर्वइतिहासाची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे, सपोनि दिपक ढोके तसेच पोलीस अंमलदार मच्छिद्र पाटील, प्रल्हाद वाघ, मायुस सोनवणे, दिनेश परदेशी, शिरीष भदाणे, राहुल सानप, आरीफ पटाण, धर्मेंद्र मोहिते, नरेंद्र गिरासे, सचिन गांमसाळ आणि सुशिल शंडे यांच्या पथकाने केली.
![]()
