धुळे :महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाचे उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या धुळे पंचायत समितीतील तांत्रिक सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विश्वजित संजय भामरे (वय ३१, रा. भरत नगर, नकाणे रोड, धुळे) असे अटक करण्यात आलेल्या तांत्रिक सहायकाचे नाव असून, या कारवाईमुळे पंचायत समितीतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भाऊ व वहिणीच्या नावे मौजे नंदाळे बुद्रुक येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये विहीर खोदकामासाठी ३ लाख ९९ हजार ६१० रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. यापैकी २ लाख ३९ हजार रुपयांची रक्कम यापूर्वीच लाभार्थींना अदा करण्यात आली होती. विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार पंचायत समितीकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.दरम्यान, ५ मे २०२६ रोजी तक्रारदार यांनी धुळे पंचायत समिती कार्यालयात जाऊन तांत्रिक सहायक विश्वजित भामरे यांची भेट घेतली. यावेळी भामरे याने विहिरीची मोजमाप पुस्तिका तपासणीसाठी पुढे पाठवणे व उर्वरित अनुदान मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता व उपअभियंता यांच्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठीच लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारीनंतर एसीबीने १२ मे २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, विश्वजित भामरे याने स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. सापळ्यादरम्यान भामरे हा ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला. या घटनेमुळे पंचायत समितीच्या आवारात एकच खळबळ उडाली असून, सरकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
![]()
