अहिल्यानगर/प्रतिनिधी —
अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३१७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६) अन्वये दाखल असलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून तब्बल ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.दि. २१ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी सौ. ताराबाई मुरलीधर कोकाटे या शेतात काम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यामागे रेकॉर्डवरील आरोपी गणेश दिवानजी काळे याचा हात असल्याची खात्री केली.दरम्यान, आरोपी त्याच्या साथीदारांसह अहिल्यानगर-सोलापूर रोडवरील वाकोडी गावाजवळील जुन्या जकात नाक्यावर दोन मोटारसायकलींसह येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे LCB पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने थरारक पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे गणेश दिवानजी काळे (वय २८, रा. वाकोडी, ता. जि. अहिल्यानगर)विनय उर्फ टकल्या योगेश काळे (वय १९, रा. वाळुंज, ता. जि. अहिल्यानगर)रोहित लल्या भोसले (वय २३, रा. सराटी वडगाव, ता. आष्टी, जि. बीड)मुख्य आरोपी गणेश काळे याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून व राहत्या घरातून ९ लाख ४ हजार ८०० रुपये किमतीचे १०२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन आणि १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
![]()
