शिरपूर/प्रतिनिधी
जामन्यापाडा शिवारातील झोपडीवजा घरातून बनावट देशीदारू निर्मितीचा भांडाफोड; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बनावट देशीदारू निर्मिती करणाऱ्या टोळीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई करत संपूर्ण बनावट मद्यनिर्मिती कारखानाच उद्ध्वस्त केला आहे. जामन्यापाडा शिवार, ग्रामपंचायत न्यू बोराडी परिसरातील नाल्याच्या कडेला असलेल्या झोपडीवजा घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल ८ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनास्थळी असलेले आरोपी पथकाला पाहताच पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.मा. राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. प्रसाद सुर्वे साहेब, सह आयुक्त (अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्रीमती यु.आर. वर्मा मॅडम, विभागीय उप आयुक्त, नाशिक विभाग तसेच श्रीमती स्वाती काकडे मॅडम, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांनी राज्यात बनावट मद्यनिर्मिती व विक्री रोखण्यासाठी दिलेल्या कडक निर्देशांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मच्छिंद्र तारासिंग पावरा यांच्या झोपडीवजा घरात काही इसम बनावट देशीदारू तयार करून विक्रीचा अवैध व्यवसाय करत आहेत. या माहितीची खातरजमा करून दोन पंचांच्या उपस्थितीत तसेच पथकासह जामन्यापाडा शिवारात छापा टाकण्यात आला.या कारवाईदरम्यान पथकाला घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बनावट मद्यनिर्मिती साहित्य आढळून आले. त्यामध्ये देशीदारू “टॅगोपंच” ९० मिलीच्या ३०० सीलबंद बाटल्या (३ बॉक्स), ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाकीत साठवलेले ४५० लिटर तयार बनावट देशीदारू, ९० मिलीच्या तब्बल १२ हजार रिकाम्या बाटल्या, २५० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक ड्रममध्ये ५०० लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरीट), ५ हजार जिवंत बुचे, ३०० रिकामे खोके, २० प्लास्टिक ट्रे, स्पिरीट वासाचे दोन ३५ लिटर क्षमतेचे प्लास्टिक केन, दोन कॅप सीलिंग मशीन तसेच एक बोलेरो पिकअप वाहन असा मोठा साठा जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपी राजेश पावरा व त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५ (ब), (क), (ड), (ई), (फ), ८१, ८३, ९० व १०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, फरार आरोपींसह या अवैध धंद्याला साहित्य पुरवणाऱ्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.सदरची कारवाई निरीक्षक देविदास नेहूल यांच्या नेतृत्वाखाली जवान काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे व वाहन चालक रविंद्र देसले यांच्या पथकाने केली. तसेच राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हाडाखेड येथील दुय्यम निरीक्षक मुकेश पाटील, जवान संतोष निकम, एम.पी. म्हस्के, हेमंत पाटील व वाहन चालक निलेश मोरे यांनी या मोहिमेत महत्त्वाची मदत केली.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास श्रीमती स्वाती काकडे मॅडम, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देविदास नेहूल हे करीत आहेत.
![]()
