शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहरातील दि. शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमधील तब्बल १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांच्या अपहार व आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळातील एका संचालकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार बँकेचे अधिकारी, कर्मचारी, चेअरमन आणि काही कर्जदार अशा एकूण ४६ जणांनी संगनमत करून बँक तसेच सभासद व ठेवीदारांची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२५ दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहितेच्या कलम ४०३, ४०९, ४२०, १२०(ब) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.तपासादरम्यान मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळातील १४ संचालकांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत
काशीनाथ सोमा महाजन,राजेंद्र शिवप्रसाद पंडित,तुषार विश्वासराव रंधे,मनोज ओमप्रकाश अग्रवाल,नवनित गिरधारीलाल राखेचा,महेश जयराम लोहार,साहेबराव भिका महाजन,केवलसिंग बाबुराव राजपूत,मुकेश ताराचंद अग्रवाल,किरण यशवंत दलाल (अटक),रामचंद्र उखा ठाकरे,विनोद शांतीलाल चावडा,सौ. पुनम राजेश भंडारी,श्रीमती स्मिता वनीतलाल कोठारी दरम्यान, तपास सुरू असताना आरोपी किरण यशवंत दलाल (संचालक, दि. शिरपूर मर्चंट को-ऑप. बँक) यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचा गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने १६ जून २०२६ रोजी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात आणखी काही संचालक, अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता असून आर्थिक गुन्हे शाखेचा तपास वेगाने सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता गवांदे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
![]()
