शिरपूर | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पारंपरिक पशुपालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरवाड-रबारी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पद्मश्री भिकू दादासाहेब रामजी इदाते (माजी अध्यक्ष, विमुक्त घुमंतू जनजाती आयोग, भारत सरकार) यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.राज्यात सुमारे १० लाख लोकसंख्या असलेल्या भरवाड-रबारी समाजाचे अस्तित्व, ओळख आणि मूलभूत अधिकार आजही प्रशासकीय दुर्लक्षामुळे संकटात सापडले असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली. समाजाचा प्रमुख व्यवसाय पशुपालन असून नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोंदिया व गडचिरोलीसह राज्यभर भटकंती करून पशुधनाचे संगोपन केले जाते. मात्र सततच्या स्थलांतरामुळे अनेकांचा जन्म व मृत्यू अधिकृत नोंदींशिवाय होत असल्याने हजारो कुटुंबे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत.
प्रमुख मागण्या :
🔹 भरवाड व रबारी समाजाची महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत गॅझेटमध्ये स्वतंत्र नोंद करावी.
🔹 जन्म दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदी कागदपत्रांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत.
🔹 पशुधनासाठी कायमस्वरूपी चराई पट्टे उपलब्ध करून द्यावेत.
🔹 दूध उत्पादक पशुपालकांना हमीभाव व वाढीव दर देण्यासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावे.
🔹 कागदपत्रांच्या अभावामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष शासन निर्णय काढावा.
🔹 भटक्या पशुपालकांसाठी फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, लसीकरण मोहीम व आपत्कालीन सेवा सुरू कराव्यात.
🔹 दुष्काळ व आपत्ती काळात चारा छावण्या, पाणीपुरवठा व विशेष आर्थिक मदत उपलब्ध करावी.
🔹 भरवाड-रबारी समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करून शिक्षण, रोजगार, आरोग्य व पशुपालन क्षेत्रात विशेष योजना राबवाव्यात.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भरवाड-रबारी समाज राज्याच्या दुग्ध उत्पादन, पशुसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असूनही आजही मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी समाजबांधवांना संबोधित करताना विभाभाई जोगराणा यांनी, “आपल्या समाजाला संघटनेशिवाय पर्याय नाही. भरवाड समाज संघटनेशी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन संघटित व्हावे,” असे आवाहन केले.नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमात भटके विमुक्त भरवाड-रबारी समाजातील हजारो समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी विभाभाई जोगराणा, रामाजी जोगराणा, राजुभाई बुधेलिया, अमितभाई सभाड, नवीनभाई मेरे, खेंगारभाई भरवाड, हमीरभाई भरवाड, जाधवभाई, गोराभाई, दानाभाई, गगजीभाई भरवाड, गगजीभाई जोगराणा, दलाभाई मीर, सुरेशभाई जोगराणा, मुन्नाभाई अलगोतर, वाहाभाई भरवाड, अजुभाई भरवाड, बिजलभाई, नथ्थुभाई, भरतभाई, वेलाभाई, घुघाभाई भरवाड, मफाभाई भरवाड आदी उपस्थित होते.
![]()
