जळगाव | प्रतिनिधी
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी आज (दि. १९ जून) पहाटे “ऑपरेशन ड्रॉप केस” हे विशेष अभियान राबवत हलखेडा, मधापुरी आणि लालगोटा या दरोडाग्रस्त गावांमध्ये एकाचवेळी धडक कोम्बिंग ऑपरेशन केले. तब्बल २०० पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या कारवाईत अनेक संशयित व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अल्प लोकसंख्या असलेल्या या गावांमधून सातत्याने चोरी, दरोडे, शस्त्र बाळगणे, घरफोडी व इतर गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे समोर येत असल्याने पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही विशेष मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला असून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मधापुरी येथील फरेज राजू पवार (वय ४०) याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर हलखेडा येथील रामजाने राईसाहेब भोसले (वय ३२) याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि संशयास्पद चलनी नोटांची बंडले जप्त करण्यात आली आहेत.आक्काबाई जोगिंदर भोसले हिच्याकडून ६.४२ लाखांची रोख रक्कम, १७ मोबाईल आणि तब्बल ३६ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.तर रोहित सुदेश पवार याच्याकडून १४ लाख रुपयांची रोख रक्कम व दोन लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले.राजकिसन जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवकिसन जोगिंदर भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले आणि जोगिंदर राजवंती भोसले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) अंतर्गत घरफोडी व चोरीच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गांझी दरियासिंग भोसले याच्याकडून हरण, कोल्हा आणि ससा (रॅबिट) यांच्या कातड्यांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला विलास नरविलाल पवार तसेच अजय दादा पवार या आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.
📊 कारवाईचा एकूण आढावा
रोख रक्कम – २० लाख रुपये ,सोन्याचे दागिने – ३०० ग्रॅम (अंदाजे ३० लाख रुपये) ,चांदीचे दागिने – ४ किलो (अंदाजे ८ लाख रुपये), गावठी कट्टे – २, जिवंत काडतुसे – ३, वन्य प्राण्यांची कातडी – ३ ,चारचाकी वाहने – ४, दुचाकी वाहने – ६ , मोबाईल फोन – ३०
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, महेश गायकवाड, निलेश गायकवाड, राहुल वाघ, आशिष लव्हांगळे तसेच विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि सुमारे २०० पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
![]()
