अहिल्यानगर | प्रतिनिधी
शेवगाव शहरातील गजबजलेल्या परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा करत तीन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता फिर्यादी रंजना दिलीप जेठे या मिरसगाव येथील लग्नसमारंभ आटोपून आपल्या मुलीच्या घरी चारचाकी वाहनाने जात होत्या. त्यावेळी वरूर चौक, शेवगाव येथे रस्ता ओलांडताना वाहनाचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी वाहनाच्या खिडकीतून हात घालून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व राणीहार जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठित करण्यात आले. पोउपनिरीक्षक संदीप मुरकुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला.तपासादरम्यान मुख्य आरोपी लखन विजय काळे (वय २३, रा. शेवगाव) हा त्याच्या साथीदारांसह तारकपूर बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लखन विजय काळे व कानिफनाथ अंबादास झिपरे (वय ३९, रा. कोळगाव, ता. शेवगाव) यांना ताब्यात घेतले.कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीतील सोन्याचा ऐवज भारत महादेव दहिवाळकर (वय ५१, रा. शेवगाव) याच्याकडे दिल्याचेही त्यांनी सांगितले.आरोपींकडून ५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्तीची कारवाई पंचांसमक्ष करण्यात आली.आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मालमत्तेविरुद्धचे आणखी अनेक गुन्हे केल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये शेवगाव, पाथर्डी, नेवासा आणि सोनई पोलीस ठाण्यांतील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश असून एकूण सात गुन्ह्यांची उकल झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.या उल्लेखनीय कारवाईत पोउपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, फुरकान शेख, रमिझराजा आतार, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, योगेश कर्डीले, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे तसेच चालक उत्तरेश्वर मोराळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. अटक आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.
![]()
