धुळे | प्रतिनिधी
जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) धुळे यांनी आणखी एक मोठी कारवाई करत अवैधरित्या गावठी कट्टा (पिस्टल) आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका युवकास अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना मोठा धक्का बसला आहे.धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रास्त्र धारकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत असताना, दि. १९ जून २०२६ रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे सोनगीर उड्डाण पुलाजवळील बोगद्याच्या परिसरात सापळा रचण्यात आला.यावेळी संशयित मुकेश परशुराम पावरा (वय २१), रा. सुभानपाडा, बोरपाणी, ता. शिरपूर, जि. धुळे हा विनापरवाना गावठी कट्टा (पिस्टल) बाळगून संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा (मॅगझीनसह) व एक जिवंत काडतूस असा एकूण रु. ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित युवकाकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाणे गु.र.नं. २२१/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीकडून जप्त करण्यात आलेले शस्त्र कुठून आणले, त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता आणि त्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्रास्त्रांच्या पुरवठा साखळीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सदर उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, पोलीस अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर आणि संजय सुरसे यांनी संयुक्तपणे यशस्वी केली.अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील ही कारवाई जिल्हा पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधातील कठोर भूमिकेचे उदाहरण ठरत असून अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
![]()
