नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी सारंगखेडा पोलिसांनी धडक कारवाई करत गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून तब्बल ५ लाख ९८ हजार ४४० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त करण्यात आला.दिनांक २१ जून २०२६ रोजी देऊर-टेम्भा मार्गावरील उसाच्या शेताजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या MH 39 L 9900 क्रमांकाच्या वाहनाची पोलिसांनी कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान महाराष्ट्र शासनाने विक्री व साठवणुकीस बंदी घातलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित पान मसाला आढळून आला. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जप्त मालाची तपासणी करून नमुने संकलित केले. प्राथमिक तपासात हा माल प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि कायद्याला हरताळ फासणाऱ्या अशा अवैध व्यवसायिकांविरुद्ध कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. संबंधित दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून अवैध साठेबाज, विक्रेते आणि वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर यापुढे आणखी कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
“जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता माफी नाही; गुटखा माफियांवर प्रशासनाचा बुलडोझर सुरू!”
![]()
