मुक्ताईनगर (आकाश बेलदार ) प्रतिनिधी :-
‘दो बूंद जिंदगी की’ या जनजागृतीच्या संदेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली येथे राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम-२०२६ उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालक पोलिओमुक्त राहावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या मोहिमेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस दिली.मोहिमेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आले. अंतुर्लीसह परिसरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध मोहीम राबविली.या मोहिमेसाठी विशेष लसीकरण पथके नियुक्त करण्यात आली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील, आरोग्य निरीक्षक आनंदा ठाकरे, आरोग्य सेवक पवन बोदडे, कृष्णा भोकरे, पंकज पवार, प्रल्हाद राठोड, सुनील वानखडे तसेच सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी घरोघरी जाऊन जनजागृती व लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले.आरोग्य केंद्राच्या माहितीनुसार, ज्या बालकांचे लसीकरण काही कारणास्तव राहिले आहे, त्यांच्यासाठी लवकरच ‘मोप-अप राऊंड’ आयोजित करण्यात येणार असून, एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालकांनी दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादाचे कौतुक करत, “पोलिओमुक्त भारतासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचणे हीच खरी सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन केले.
![]()
