नवापूर | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी गुटखा तस्करीविरोधात मोठी धडक कारवाई करत महामार्गावर नाकाबंदी दरम्यान प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघडकीस आणली. गुजरातमधील सुरत येथून आंध्र प्रदेशातील विजयवाडाकडे कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि कंटेनरसह तब्बल ३५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी नवापूर येथील एका हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून RJ-19 JK-1963 क्रमांकाचा कंटेनर अडवला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये विविध साहित्याच्या पार्सलखाली अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण माल जप्त करून चालकाला ताब्यात घेतले.कारवाईत २ लाख २० हजार रुपये किमतीचा ‘मेजबान जाफरानी जर्दा’ तंबाखूचा साठा, ३ लाख रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, तसेच ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ३५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी कंटेनर चालक कायमदीन खान सुलतानखान (वय २२, रा. श्यामपुरा, जि. बारमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, माल कोणाचा होता आणि तो नेमका कुठे पोहोचविण्यात येणार होता, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे तसेच नवापूर पोलीस पथकाने अचूक नियोजन आणि सतर्कतेच्या जोरावर पार पाडली.
![]()
