सत्यध्येय एकविचार
चोपडा | प्रतिनिधी :
चोपडा शहरात खेळता खेळता रस्ता चुकून हरवलेल्या अवघ्या ६ वर्षीय चिमुकल्याचा चोपडा शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत सुखरूप शोध लावत संवेदनशील आणि कार्यक्षम पोलिसिंगचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण यंत्रणा कामाला लावत वेगवान तपासाची सूत्रे हलवली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे एका कुटुंबाला त्यांचा लाडका चिमुकला पुन्हा सुखरूप मिळाला.बुधवार, १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथील रहिवासी शोभाबाई कैलास चौधरी यांचा नातू रुद्र संदीप चौधरी (वय ६) हा खेळता खेळता रस्ता चुकून बेपत्ता झाल्याची माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्यात मिळाली. लहान मुलगा हरवल्याचे समजताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथके तातडीने रवाना करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी, स्थानिक माहितीचे संकलन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पोलिसांनी चिमुकल्याचा माग काढला. अवघ्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रुद्रला सुखरूप ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.पोलीस ठाण्यात आणल्यानंतर रुद्रने आपली ओळख सांगितली. त्यानंतर त्याची आजी शोभाबाई चौधरी तसेच कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. हरवलेला नातू सुखरूप समोर दिसताच कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.या यशस्वी कारवाईमुळे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या तत्पर निर्णयक्षमतेचे, संवेदनशीलतेचे आणि चोपडा शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. चौधरी कुटुंबाने पोलीस निरीक्षक पवन देसले व संपूर्ण पोलीस पथकाचे मनःपूर्वक आभार मानत, “आमच्यासाठी पोलीस देवदूत ठरले,” अशी भावना व्यक्त केली.
![]()
