सत्यध्येय एकविचार
धरणगाव | प्रतिनिधी :
धरणगाव येथील बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरी करणाऱ्या घरफोडी प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कौशल्यपूर्ण तपास करून यशस्वी उलगडा केला आहे. अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण ₹७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संदीप थोरात (वय २६, रा. संजयनगर, धरणगाव) व कार्तिक ऊर्फ आबा महाजन (वय २०, रा. एकतानगर, धरणगाव) अशी आहेत.फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह दि. २३ मार्च २०२६ रोजी देवदर्शनासाठी घराबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ₹१ लाख ९८ हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या गंभीर गुन्ह्याची दखल घेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीचे विश्लेषण केले. संशयितांच्या हालचालींचा माग काढत अखेर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपींनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे धरणगाव परिसरातील घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. उर्वरित चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे, आरोपींचे इतर गुन्हे उघडकीस आणणे आणि या टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असून, तपास धरणगाव पोलीस ठाणे करीत आहे.
![]()
